Bible Language

1 Chronicles 20 (ERVMR) Easy to Read - Marathi

1 राजे लढाईच्या मोहिमेवर बाहेर पडतात अशावेळी म्हणजे वर्षारंभी यवाब इस्राएलाचे सैन्य घेऊन युध्दासाठी निघाला. पण दावीद यरुशलेममध्येच राहिला. इस्राएलचे सैन्य अम्मोन्यांच्या नगरात शिरले आणि त्यांनी तो मुलूख उद्ध्वस्त केला. मग त्यांनी राब्बा नगराकडे आपला मोर्चा वळवला. त्यांनी नगराला वेढा घातला आणि लोकांची नाकेबंदी केली. राब्बा नगर पडेपर्यंत यवाबने इस्राएली सैन्यासह नगरावर हल्ला चालू ठेवला, राब्बा उद्ध्वस्त केले.
2 दावीदाने, त्या लोकांच्या राजाच्या मस्तकावरील मुकुट काढला. त्या सोन्याच्या रत्नजडित मुकुटाचे वजन पंचेचाळीस पौंड होते. तो दावीदाच्या मस्तकावर ठेवण्यात आला. राब्बा नगरातून आणखीही पुष्कळ लूट दावीदाला मिळाली.
3 राब्बातील लोकांना बाहेर काढून दावीदाने त्यांच्याकडून करवती, कुऱ्हाही, पहाडी या हत्यारांनी करायच्या कष्टाच्या कामाला जुंपले. अम्मोन्यांच्या सर्व नगरांमध्ये दावीदाने हेच केले. मग दावीद आणि त्याचे सैन्य यरुशलेमला परतले.
4 पुढे गेजेर येथे इस्राएल लोकांचे पलिष्ट्यांशी युध्द झाले. या लढाईत सिब्बखय हूशाथी याने सिप्पय याला ठार मारले. सिप्पय हा अत्यंत धिप्पाड रेफाई वंशातला होता. तेव्हा हे पलिष्टि लोक इस्राएलींना शरण आले.
5 इस्राएलींची पुढे पुन्हा एकदा पलिष्ट्यांशी लढाई झाली. त्यावेळी याईरचा मुलगा एलहानान याने गथच्या गल्याथचा भाऊ लहमी याला ठार केले. लहमीचा भाला चांगला लांबलचक आणि जाडजूड होता. हातमागाच्या तुरीसारखा तो मोठा होता.
6 गथ येथे पलिष्ट्यांशी इस्राएल लोकांची आणखी एकदा लढाई झाली. या गावात तेव्हा एक प्रंचंड आकारमानाचा माणूस होता. त्याच्या हातापायांना प्रत्येकी सहासहा, अशी एकंदर चोवीस बोटे होती. तो राक्षसपुत्रच होता.
7 अशा माणसाने इस्राएल लोकांचा उपहास केल्यावर योनाथानने त्याला ठार केले. योनाथान हा शिमीचा मुलगा. शिमी दावीदाचा भाऊ.
8 पलिष्टे ही गथ नगरातील बलाढ्य लोकांची संतती. दावीद त्याचे सेवक यांनी त्यांचे पारिपत्य केले.