Bible Versions
Bible Books

2 Corinthians 8 (MRV) Marathi Old BSI Version

1 आणि आता, बंधूनो, आम्हांला असे वाटते की, तुम्ही हे जाणून घ्यावे की, मासेदिनियातील मंडळ्यांना देवाने कशी कृपा दिली.
2 अत्यंत खडतर अशी संकटे असली तरी त्यांचा ओसंडून वाहणारा आनंद आणि त्यांचे आत्यांतिक दारिद्य विशाल उदारतेत उभे राहिले.
3 कारण मी साक्ष देतो की, त्यांना जितके शक्य होते तितके त्यांनी दिले. आणि त्यांच्या क्षमतेपेक्षाही जास्त दिले. त्यांनी उत्सफूर्तपणे स्वत:ला दिले.
4 संतांच्या सेवेमुळे मिळणाऱ्या आशीर्वादामध्ये सहभागी होण्याचा बहुमान मिळावा म्हणून त्यांनी आस्थेवाईकपणे आम्हांला विनंति केली.
5 आणि आम्ही अपेक्षा केली त्याप्रमाणे त्यांनी केले नाही, तर त्यांनी स्वत:ला प्रथम देवाला दिले. आणि मग देवाच्या इच्छेला राखून आम्हांला दिले.
6 मग आम्ही तीताला विनंति केली, त्याने अगोदर जशी सुरुवात केली होती तशीच त्याने तुम्हामध्ये या कुपेची पूर्णताही करावी.
7 म्हणून जसे तुम्ही सर्व गोष्टीत, म्हणजे विश्वासात, बोलण्यात ज्ञानात सर्व आस्थेत आम्हांवरील आपल्या प्रीतीत वाढला आहा, तसे तुम्ही या कृपेतही फार वाढावे.
8 मी तुम्हांला आज्ञा करीत नाही, पण मला तुमच्या प्रेमच्या प्रामाणिकतेची तुलना इतरांच्या आस्थेशी करायची आहे.
9 कारण तुम्हांला आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताची कृपा माहीत आहे की, जरी तो श्रीमंत होता तरी तुमच्याकरिता तो गरीब झाला, यासाठी की, त्याच्या गरीबीने तुम्ही श्रीमंत व्हावे.
10 आणि तुमच्या फायद्यासाठी माझा सल्ला असा आहे की, गेल्या वर्षी तुम्ही केवळ देण्यातच नव्हे तर तशी इच्छा करण्यात पहिले होता.
11 आता ते काम पूर्ण करा, यासाठी की कार्य करण्याची तुमची उत्सुकता ही ती तुमच्याकडे ज्या प्रमाणात आहे त्यानुसार पूर्ण करण्यात यावी.
12 कारण जर इच्छा असेल, तर एखाद्याकडे जे असेल तसे मान्य होईल. जर नसेल तर मान्य होणार नाही.
13 दुसऱ्याचे ओझे हलके करण्यासाठी तुमच्यावर ओझे लादावे असे नाही तर समानता असावी म्हणून.
14 सध्याच्या काळात तुमच्या विपुलतेतून त्यांची गरज भागावी. यासाठी की नंतर त्याच्या विपुलतेमुळे तुमच्या गरजा भागविल्या जाव्यात. मग समानता येईल.
15 पवित्र शास्त्र म्हणते,“ज्याने पुष्कळ गोळा केले होते, त्याला जास्त झाले नाही. ज्याने थोडे गोळा केले होते, त्याला कमी पडले नाही.” निर्गम 16: 18 तीत आणि त्याचे सोबती
16 जी आस्था माझ्यामध्ये तुमच्याविषयी आहे ती आस्था देवाने तीताच्या अंत:करणात घातली याबद्दल मी देवाचे आभार मानतो,
17 कारण तीताने आमच्या आवाहनाचे स्वागतच केले असे नाही तर तो पुष्कळ उत्सुकनेने आणि त्याच्या स्वत:च्या मोठ्या आस्थेने तुमच्याकडे येत आहे.
18 आणि आम्ही त्याच्याबरोबर एका बंधूला ज्याची त्याच्या सुवार्तेबद्दलच्या मंडळ्यातील सेवेबद्दल वाहवा होत आहे, त्याला पाठवीत आहोत.
19 यापेक्षा अधिक म्हणजे मंडळ्यांनी आम्हासांगती दानार्पण घेऊन जाण्यासाठी त्याची निवड केली. जे आम्ही प्रभुच्या गौरवासाठी करतो आणि मदत करण्याची आमची उत्सुकता दिसावी म्हणून हे करतो.
20 ही जी विपुलता आम्हांकडून सेवेस उपयोगी पडत आहे तिच्या कामात कोणीही आम्हांवर दोष लावू नये म्हणून आम्ही काळजीपूर्वक वागत आहोत.
21 कारण जे प्रभुच्या दृष्टीने चांगले तेच आम्ही योजितो, एवढेच नाही तर माणसांच्या दृष्टीने जे चांगले ते योजितो.
22 त्याला सोडून आम्ही त्यांच्याबरोबर आमच्या बंधूलाही पाठवित आहोत. ज्याने आम्हाला स्वत:ला पुष्कळ बाबतीत आवेशी असल्याचे सिद्ध करुन दाखविले आहे आणि आता त्याला तुमच्याबद्दल वाटत असलेल्या विश्वासामुळे तो अधिक आवेशी झाला आहे.
23 तीताच्या बाबतीत सांगायाचे तर, तो तुमच्यामधील माझा एक सहकारी सहकर्मचारी आहे, आमच्या इतर बंधूंच्या बाबतीत सांगायचे तर, ते ख्रिस्ताला गौरव मंडळ्यांचे प्रतिनिधी आहेत.
24 म्हणून या लोकांना तुमच्या प्रेमाचा पुरावा द्या. आणि आम्हांला तुमच्याबद्दल वाटत असलेल्या अभिमानबद्दलचे समर्थन करा. यासाठी की, मंडळ्यांनी ते पाहावे.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×