Bible Versions
Bible Books

Genesis 12 (MRV) Marathi Old BSI Version

1 परमेश्वर अब्रामाला म्हणाला,“तू आपला देश, आपले गणगोत आपल्या बापाचे घर सोड; आणि मी दाखवीन त्या देशात जा.
2 2 मी तुला आशीर्वाद देईन; तूझ्या पासून मोठे राष्ट्र निर्माण करीन; मी तुझे नाव मोठे करीन, लोक तुझ्या नावाने इतरांना आशीर्वाद देतील,
3 3 जे लोक तुला आशीर्वाद देतील त्यांना मी आशीर्वाद देईन, आणि जे लोक तुला शाप देतील त्यानां मी शाप देईन. तुझ्यामुळे पृथ्वीवरील सर्वलोक आशीर्वादित होतील.”
4 4 तेव्हा अब्रामाने परमेश्वराची आज्ञा मानली. त्याने हारान सोडले लोट त्याच्या बरोबर गेला. या वेळी अब्राम पंच्याहत्तर वर्षांचा होता.
5 5 हारान सोडताना तो एकटा नव्हता तर त्याने आपली बायको साराय, पुतण्या लोट आणि हारानमध्ये त्यांनी मिळवलेली मालमत्ता तसेच गुलाम या सर्वांना बरोबर घेऊन त्याने हारान सोडले तो कनान देशाच्या प्रवासास निघाला आणि कनान देशात आला.
6 6 अब्राम कनान देशातून प्रवास करीत शखेम गावला आला आणि मोरेच्या मोठ्या वृक्षांपर्यंत गेला. याकाळी त्या देशात कनानी लोक राहात होते.
7 7 परमेश्वर अब्रामास दर्शन देऊन म्हणाला, “हा देश मी तुझ्या वंशाजांना देईन.”ज्या जागेवर परमेश्वराने अब्रामाला दर्शन दिले त्या जागी त्याने परमेश्वराची उपासना करण्यासाठी एक वेदी बांधली.
8 8 मग अब्राम तेथून निघाला आणि प्रवास करीत तो बेथेलच्या पूर्वेस डोंगराळ भागात पोहोंचला त्याने तेथे तळ दिला; तेथून बेथेल पश्चिमेस होते आणि आय शहर पूर्वेस होते; तेथे त्याने परमेश्वरासाठी दुसरी वेदी बांधली आणि देवाची उपासना केली.
9 9 त्यानंतर अब्राम पुन्हा पुढच्या प्रवासास निघाला नेगेबकडे गेला.
10 10 त्या काळी त्या प्रदेशात मोठा दुष्काळ पडला; तेथे पाऊस पडला नाही आणि अन्नधान्य उगवले नाही. म्हणून अब्राम मिसरमध्ये राहाण्यास गेला.
11 11 आपली बायको साराय फार सुंदर आहे असे अब्रामाने पाहिले; तेव्हा मिसर देशाच्या हद्दीत शिरण्यापूवी अब्राम साराय हिला म्हणाला, “मला माहीत आहे की तू अतिशय सुंदर रुपवान स्त्री आहेस,
12 12 म्हणून मिसरचे लोक जेव्हा तुला पाहतील तेव्हा ते म्हणतील ‘ही त्याची बायको आहे.’ आणि मग तुझ्या साठी ते मला मारुन टाकतील;
13 13 तर तू माझी बहीण आहेस असे तू लोकांस सांग म्हणजे मग ते मला मारणार नाहींत; ते माझ्यावर दया करतील; अशा रीतीने तू माझा जीव वाचवशील.”
14 14 मग अब्राम मिसर देशात गेला; तेथील लोकांनी पाहिले की साराय ही फार सुंदर स्त्री आहे.
15 15 मिसरच्या राजवाड्यातील सरदारांनी सारायला पाहिले त्यांनी आपला राजा फारो याच्या जवळ तिच्या सौंदर्याची वाखाणणी केली; आणि त्यांनी तिला राजाच्या घरी नेऊन ठेवले.
16 16 अब्राम सारायचा भाऊ आहे असे समजल्यावर फारो राजाने त्याजवर दया केली त्याला मेंढरे, गुरेढोरे, गाढवे दिली तसेच अब्रामाला दास, दासी उंटही मिळाले.
17 17 अब्रामाची बायको साराय हिला फारोने नेले म्हणून परमेश्वराने फारो त्याच्या घरातील लोकाना भयंकर रोगाची पीडा भोगावयास लावली.
18 18 तेव्हा फारोने अब्रामास बोलावले. तो म्हणाला. “तू माझ्याबाबत फार वाईट गोष्ट केलीस, साराय तुझी बायको आहे, हे तू मला सांगितले नाहीस का?
19 19 ‘ती माझी बहीण आहे’ असे तू का म्हणालास? मला बायको करण्यासाठी मी तिला नेले होते परंतु मी आता तुझी बायको तुला परत करतो; तिला घे येथून निघून जा.”
20 20 मग अब्रामाची मिसरमधून बाहेर रवानगी करावी अशी फारोने आपल्या सरदारांना आज्ञा दिली; तेव्हा अब्राम त्याची बायको साराय यांनी आपले सर्व काही बरोबर घेऊन मिसर सोडले.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×