Bible Versions
Bible Books

:

1 “इस्राएल लोकहो, आता मी जे नियम आणि आज्ञा सांगतो ते नीट ऐकून घ्या. त्यांचे पालन केलेत तर जिवंत राहाल आणि तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर जो देश तुम्हाला देणार आहे त्याचा ताबा घ्याल.
2 माझ्या आज्ञांमध्ये तुम्ही अधिक - ऊणे करु नका. या तुमचा देव ह्याच्या आज्ञा मी तुम्हाला देत आहे. त्या तुम्ही पाळा.
3 “बाआल पौराच्या जे नादी लागले त्यांना परमेश्वराने नष्ट केले.
4 पण परमेश्वराशी एकनिष्ठ राहिलेले तुम्ही आज जिवंत आहा.
5 “परमेश्वराने आज्ञा दिली त्याप्रमाणे विधी आणि नियम मी तुम्हाला शिकवले. तुम्ही जो देश ताब्यात घ्यायला जात आहात तेथे तुम्ही ते पाळावेत म्हणून मी ते सांगितले.
6 त्यांचे काटेकोरपणे पालन करा. म्हणजे तुम्ही सूज्ञ समजूतदार आहात हे इतर देशवासियांना कळेल. ते हे नियम ऐकून म्हणतील, ‘खरंच, हे महान राष्ट्र (इस्राएल) बुद्धिमान समंजस लोकांचे आहे.’
7 “आपण आपला देव परमेश्वर ह्याचा धावा करतो तेव्हा तो आपल्या जवळच असतो, असे कोणत्या राष्ट्राचे आहे बरे?
8 ज्या विधी आणि नियमांची शिकवण मी तुम्हाला दिली तसे नियमशासत्र असणारे दुसरे राष्ट्र तरी कोठे आहे?
9 पण तुम्ही हे डोळ्यांत तेल घालून जपले पाहिजे. नाही तर तुम्ही ज्या गोष्टी पाहिल्या आहेत त्या विसरुन जाल. आपल्या मुला नातवंडांना त्याची माहिती द्या.
10 तुम्ही सर्व होरेब पर्वतापाशी परमेश्वरासमोर उभे होतात तो दिवस आठवा. परमेश्वर मला म्हणाला होता, ‘मला काही सांगायचे आहे तेव्हा सर्वांना एकत्र बोलाव. म्हणजे आयुष्यभर ते माझ्याबद्दल आदर बाळगतील. आपल्या मुलबाळांनाही तशीच शिकवण देतील.’
11 मग तुम्ही जवळ आलात पर्वताच्या पायथ्याशी उभे राहिलात. तेव्हा डोंगर उभा पेटला होता त्याच्या ज्वाळा आकाशाला भिडल्या होत्या. सर्वत्र काळेकुट्ठ ढग आणि अंधार पसरला होता.
12 परमेश्वर त्या अग्नीतून तुमच्याशी बोलला. तुम्हाला आवाज ऐकू आला पण दिसले काहीच नाही. फक्त वाणी ऐकू आली.
13 परमेश्वराने आपला पवित्र करार तुम्हाला सांगितला. त्याने तुम्हाला दहा आज्ञा सांगितल्या त्यांचे पालन करण्याविषयी तुम्हाला आज्ञा दिली. त्याने त्या आज्ञा दोन दगडी पाट्यांवर लिहून दिल्या.
14 त्याचवेळी तुम्ही ज्या देशात वस्ती करणार होतात तेथे पाळण्यासाठी आणखीही काही विधी नियम परमेश्वराने मला तुम्हाला शिकवण्यास सांगितले.
15 “होरेब पर्वतावरुन अग्रीतून परमेश्वर तुमच्याशी बोलला. त्या दिवशी तो तुम्हाला दिसला नाही. कारण त्याला कोणताही आकार नव्हता.
16 तेव्हा जपून असा. कोणत्याही सजीवाची प्रतिमा किंवा खोटी दैवते उभारण्याचे पाप करुन स्वत:ला बिघडवू नका. स्त्री किंवा पुरुषासारखी दिसणारी मूर्ती करु नका.
17 जमिनीवरील प्राणी किंवा आकाशात उडणारा पक्षी,
18 जमिनीवर सरपटणारा जीव किंवा समुद्रातील मासा अशासारखीही मूर्ती करु नका.
19 तसेच आकाशातील सूर्य, चंद्र, तारे आणि इतर गोष्टी पाहाताना सावध राहा. त्यांच्यापुढे लोटांगण घालून त्यांची उपासना करु नका. या गोष्टी तो जगातील इतरांना करु देतो.
20 पण तुम्हाला त्याने मिसर देशाबाहेर आणले आणि तुम्हाला स्वत:चे खास लोक केले. जणू तापलेल्या लोखंडी भट्ठीतून त्याने तुम्हाला बाहेर काढले आणि तुम्ही आता त्याचे खास लोक आहा!
21 “तुमच्यामुळे परमेश्वराचा माझ्यावर कोप झाला त्याने निश्चयाने सांगितले की मी यार्देन नदीपलीकडे पाऊल ठेवू शकणार नाही. परमेश्वराने तुम्हाला दिलेल्या ज्या सुपीक भूमीत तुम्ही प्रवेश करणार आहात, तेथे मला मज्जाव आहे.
22 त्यामुळे मी येथेच देह ठेवणार आहे. मी यार्देन नदीपलीकडे येऊ शकत नसलो तरी तुम्ही तो चांगला प्रदेश ताब्यात घ्या राहा.
23 तेथे तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्याशी केलेला पवित्रकरार विसरु नका त्याच्या आज्ञा पाळा. कुठल्याही प्रकारे कोणत्याही आकाराची मूर्ती करु नका.
24 कारण मूर्तीपूजेचा त्याला तिटकारा आहे. परमेश्वर देव ईर्ष्यावान् असून तो क्षणात भस्म करणारा अग्नी आहे.
25 “त्या देशात तुम्ही दीर्घकाळ राहाल. तुमचा वंश वाढेल. तुम्ही म्हातारे व्हाल. आणि मग तुम्ही स्वत:चा नाश ओढवून घ्याल तुम्ही सर्व तऱ्हेच्या मूर्ती कराल. या तुमच्या कृत्यामुळे देव क्रुद्ध होईल.
26 म्हणून मी आत्ताच तुम्हाला सावध करत आहे. स्वर्ग आणि पृथ्वी याला साक्ष आहेत. ही नीच गोष्ट कराल तर तुमचा नाश त्वरीत होईल. तुम्ही त्या प्रदेशात वस्ती करायला यार्देन नदी पार करत आहात. पण मूर्ती केल्यात तर मात्र तुम्ही तेथे फार काळ राहणार नाही. नव्हे, तुमचा सर्वस्वी नायनाट होईल.
27 परमेश्वर देव तुम्हांला वेगवेगळ्या राष्ट्रात विखरुन टाकील. आणि जेथे जेथे तो पाठवील तेथे तुमची संख्या अगदीच अल्प राहील.
28 तेथे तुम्ही माणसांनी घडवलेल्या दगडी, लाकडी दैवातांची - जे पाहू शकत नाहीत, ऐकत नाहीत, खात नाहीत की वास घेत नाहीत अशांची सेवा कराल.
29 2परंतु तेथूनही तुम्ही परमेश्वराला, आपल्या देवाला काया वाचा मने शरण गेलात तर तो तुम्हाला पावेल.
30 या सर्व गोष्टी घडतील, तुम्ही संकटात असाल तेव्हा तुम्ही पुन्हा त्याच्या कडेच परतून याल त्याला शरण जाल.
31 आपला परमेश्वर देव दयाळू आहे. तो तुम्हाला अंतर देणार नाही. तो तुमचा सर्वनाश होऊ देणार नाही. तो तुमच्या पूर्वजांशी त्याने केलेला पवित्रकरार तो विसरणार नाही.
32 “असा चमत्कार कधी घडला आहे का? कधीच नाही. पूर्वीचे आठवून बघा. तुमच्या जन्मा आधीपासूनच्याही सर्व गोष्टी आठवा. देवाने पृथ्वीवर माणूस निर्माण केला. तेव्हापासून आजपर्यंत जगाच्या कानाकोपऱ्यात घडलेल्या सर्व गोष्टी पाहा. असा महान चमत्कार कोणाच्या ऐकिवात तरी आहे का?
33 साक्षात अग्नीमधून देव तुमच्याशी बोलला, ते तुम्ही ऐकले आणि तरीही तुम्ही जिवंत आहात. असे कधी दुसऱ्या राष्ट्राच्या बाबतील घडले आहे?
34 दुसऱ्या राष्ट्रात जाऊन त्यातून एक राष्ट्र आपलेसे करायचे असा दुसऱ्या कुठल्या परमेश्वराने प्रयत्न तरी केला आहे का? नाही ना? पण आपल्या परमेश्वर देवाने या महान गोष्टी केल्याचे तुम्ही स्वत: पाहिले आहे. त्याने आपले सामर्थ्य प्रताप तुम्हाला दाखवले आहेत. कसोटी पाहणाऱ्या प्रसंगांतून तुम्ही गेलात. तुम्ही अनेक चमत्कार नवलपूर्ण गोष्टी पाहिल्यात. तसेच युद्ध आणि भयानक घटनाही पाहिल्यात.
35 परमेश्वर हाच खरा देव आहे हे तुम्हाला कळावे म्हणून त्याने तुम्हाला हे दाखवले. त्याच्यासारखा दुसरा देव नाही.
36 3तुम्हाला शिकवण द्यावी म्हणून त्याने आकाशातून आपली वाणी ऐकवली. पृथ्वीवर आपला महान अग्नी त्याने दाखवला त्यातून त्याचे शब्द तुम्ही ऐकले.
37 “त्याचे तुमच्या पूर्वजांवर प्रेम होते. म्हणून त्याने तुमची निवड केली. त्यामुळेच त्याने तुम्हाला आपल्या महान सामर्थ्याने मिसर देशातून बाहेर आणले. तो तुमच्या पाठीशी राहिला.
38 तुम्ही जसे पुढे जाल तसे त्याने तुमच्यापेक्षा मोठ्या समर्थ राष्ट्रांना हुसकून लावले आणि तेथे तुमचा शिरकाव करुन दिला. त्यांचा प्रदेश त्याने तुम्हाला राहाण्यासाठी दिला. आजही तो हे करत आहे.
39 तेव्हा, वर आकाशात आणि खाली पृथ्वीवर परमेश्वर हाच देव आहे, दुसरा कोणीही नाही. हे आज तुम्ही नीट समजून घ्या लक्षात ठेवा.
40 आज मी तुम्हाला त्याचे नियम आज्ञा सांगणार आहे, त्या पाळा. त्याने तुमचे तुमच्या मुलाबाळांचे भले होईल. तुमच्या परमेश्वर देवाने दिलेल्या प्रदेशात तुमचे वास्तव्य दीर्घकाळ राहील. तो प्रदेश कायमचा तुमचाच होईल.
41 मग मोशेने यार्देन नदीच्या पूर्वेला तीन नगरांची निवड केली.
42 अशासाठी की, पूर्वी काही वैर नसताना, जाणता एखाद्याने कोणाची चुकून हत्या केली तर त्याला ह्यातल्या एखाद्या नगराचा आसरा घेता यावा. मृत्युदंडाला सामोरे जावे लागू नये.
43 ती नगरे अशी: रऊबेनींसाठी रानातील माळावरचे बेसेर. गादींसाठी गिलादमधील रामोथ आणि मनश्शे लोकांसाठी बाशान मधील गोलान.
44 This verse may not be a part of this translation
45 This verse may not be a part of this translation
46 मोशेने हे निर्बंध त्यांना सांगितले तेव्हा ते बेथपौरच्या समोरच्या खोऱ्यात यार्देन नदीच्या पूर्वेला होते. म्हणजेच हेशबोनचा अमोऱ्यांना राजा सीहोन याला पराजित केले त्याच्या देशात. (मोशे आणि इस्राएलच्या लोकांनी मिसरातून बाहेर पडल्यावर सीहोनचा पराभव केला होता.)
47 त्यांनी हा देश आणि बाशानचा राजा ओग याचाही देश ताब्यात घेतला. अमोऱ्यांचे हे दोन्ही राजे यार्देन नदीच्या पूर्वेकडे राहात असत.
48 आर्णोन खोऱ्याच्या सीमेवरील अरोएर नगरापासून थेट सिर्योन (म्हणजेच हर्मोन) पर्वतापर्यंत हा प्रदेश पसरलेला आहे.
49 यार्देन नदीच्या पूर्वेकडील संपूर्ण खोरे, दक्षिणेला अराबा (मृत) समुद्रापर्यंतचा विस्तार, आणि पूर्वेला पिसगा पर्वताच्या पायथ्यापर्यंत एवढा हा प्रदेश त्यांनी काबीज केला होता.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×