Bible Versions
Bible Books

Joshua 6:2 (MRV) Marathi Old BSI Version

1 यरीहो शहराच्या वेशी बंद होत्या. इस्राएल लोक जवळआल्यामुळे नगरातील लोक घाबरले होते. कोणी नगराच्या बाहेर पडत नव्हते की आत येत नव्हते.
2 2 तेव्हा परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “तुमच्या हातून मी यरीहो शहराचा पराभव करवीन. या शहराचा राजा आणि सर्व योध्दे याचा तुम्ही पराभव कराल.
3 3 रोज एकदा सर्व सैन्यासह शहराभोवती फेऱ्या घाला. असे सहा दिवस करा.
4 4 सात याजकांनी मेंढ्यांच्या शिंगापासून केलेली रणशिंगे घेऊन पवित्र करार कोशापुढे चालत जायला सांग. सातव्या दिवशी शहराभोवती सात फेऱ्या घाला. सातव्या दिवशी याजकांना रणशिंगे फुकीत फेरी घालायला सांग.
5 5 याजक रणशिंगांचा एकच कर्णकटू ध्वनी करतील तेव्हा तो ध्वनी ऐकताच लोकांनाही मोठ्याने आरोव्व्या मारायला सांगावे. तसे केल्याने शहराची तटबंदी कोसळून पडेल आणि लोक सरळ आत घुसतील.”
6 6 तेव्हा नूनाचा पुत्र यहोशवाने सर्व याजकांना बोलावले त्यांना तो म्हणाला. “परमेश्वराचा पवित्र करारकोश घेऊन चला. तसेच सात याजकांना रणशिंगे घेऊन करार कोशापुढे चालायाला सांगा.”
7 7 मग तो लोकांना म्हणाला, “आता निघा आणि शहराला फेऱ्या घाला. सशस्त्र सैनिकांनी परमेश्वराच्या करार कोशापुढे चालावे.”
8 8 यहोशवाचे सांगून झाल्यावर सात याजकांनी परमेश्वरापुढे चालायला सुरूवात केली. आपली सात रणशिंगे फुंकीत ते चालले होते. परमेश्वराचा पवित्र करारकोश वाहणारे याजक त्याच्यामागून चालले होते.
9 9 सशस्त्र सैन्य सर्व सतत वेळ याजकांच्या पुढे चालत होते आणि पवित्र करार कोशामागून पृष्ठरक्षक चालले होते आणि रणशिंगे फुंकली जात होती.
10 10 यहोशवने लोकांना युध्दगर्जना करण्यास बजावले होते. तो म्हणाला, “आरडा ओरडा करू नका. मी सांगेपर्यंत एक चकार शब्दही तोडातून काढू नका. सांगेन तेव्हाच गर्जना करा.”
11 11 मग यहोशवाने याजकांना परमेश्वराचा करारकोश घेऊन नगराभोवती एक फेरी मारायला लावली. नंतर सर्वांनी छावणीत परतून ती रात्र काढली.
12 12 यहोशवा पहाटे उठला. याजकांनी परमेश्वराचा पवित्र करारकोश उचलला.
13 13 सात याजक सात रणशिंगे घेऊन सज्ज झाले. परमेश्वराच्या पवित्र करारकोशापुढे रणशिंगे वाजवत ते पुढे चालू लागले. सशस्त्रधारी सैनिक त्यांच्यापुढून चालू लागले. परमेश्वराच्या पवित्र कोशामागून पृष्ठ संरक्षक निघाले सर्व सतत वेळ रणशिंगे फुंकली जात होती.
14 14 दुसऱ्या दिवशी त्या सर्वांनी नगराभोवती एकदा फेरी मारली. मग ते छावणीत परतले. असे त्यांनी ओळीने सहा दिवस केले.
15 15 सातव्या दिवशी ते पहाटे उठले. त्यांनी नगराला सात वेळा फेऱ्या घातल्या. त्यांनी सर्व पूर्वी प्रमाणेच केले, फक्त फेऱ्या तेवढ्या सात घातल्या.
16 16 सातव्यांदा नगराभोवती फेरी घालताना याजकांनी रणशिंगे वाजवली. ती ऐकताच यहोशवाने आज्ञा केली , “गर्जना करा हे शहर परमेश्वराने तुम्हाला दिले आहे.
17 17 हे शहर आणि यातील सर्वकाही परमेश्वराचे आहे.फक्त रहाब ही वेश्या आणि तिच्या घरातील मंडळी यांना धक्कालावू नका. रहाबने आपल्या दोन हेरांना लपविले तेव्हा तिच्या घरातल्यांना मारू नका.
18 18 बाकी सर्व गोष्टींचा नाश करा. लक्षात ठेवा त्यातील काहीही घेऊ नका. तेथील एखादी वस्तू घेतलीत आणि तळावर आणलीत तर तुमचा नाश होईल. सर्व इस्राएल लोकांचाही त्यामुळे नाश होईल.
19 19 सोन्याचांदीच्या तसेच तांब्या-लोखंडाच्या सर्व वस्तू परमेश्वराच्या आहेत. त्या परमेश्वराच्या भांडारात जमा केल्या पहिजेत.”
20 20 याजकांनी रणाशिंगे वाजवली. लोकांनी ती ऐकून मोठ्याने जयघोष केला. त्याने तटबंदी कोसळली आणि इस्राएल लोक सरळ नगरात घुसले. त्यांनी नगराचा पाडाव केला.
21 21 लोकांनी शहरातील सर्व गोष्टींचा नाश केला. तरूण आणि वृध्द पुरूष, तरूण आणि वृध्द स्त्रिया, जनावरे, शेळ्या मेंढ्या, गाढवे अशा सर्व सजीवांची त्यांनी हत्या केली.”
22 22 यहोशवा त्या दोन हेरांशी बोलला. तो त्यांना म्हणाला, “त्या वेश्येच्या घरी जा आणि तिला तिच्या घरातल्यांना घेऊन या. तिला तुम्ही तसे वचन दिले आहे तेव्हा त्यांना तेथून बाहेर काढा.”
23 23 तेव्हा ते दोन हेर रहाब कडे गेले आणि त्यांनी तिला तसेच तिचे आईवडील भावंडे, घरातील इतर माणसे यांना बाहेर काढले इस्राएल लोकांच्या छावणीबाहेर या सर्वांना त्यांनी सुरक्षित जागी ठेवले.
24 24 मग इस्राएल लोकांनी त्या नगराला आग लावली. फक्त सोने, चांदी, तांबे लोखंड यांच्या वस्तू परमेश्वराप्रीत्यर्थ वगळून सर्व काही भस्मसात केले आणि त्या वस्तू परमेश्वराच्या खजिन्यात जमा केल्या.
25 25 यहोशवाने रहाब तिचे कुटुंबीय तिच्या बरोबर असलेली इतर माणसे यांना संरक्षण दिले. कारण यरीहोला त्याने पाठवलेल्या दोन हेरांना तिने मदत केली होती. रहाबच्या कुटुंबाचे वास्तव्य आजही इस्राएल लोकांमध्ये आहे.
26 26 यावेळी यहोशवाने एक महत्वाची शपथ घातली. तो म्हणाला:“जो कोणी यरीहो पुन्हा उभारण्याचा प्रयत्न करील त्याला परमेश्वराचा शाप भोगावा लागेल. जो या नगराची पायाभरणी करेल त्याचा ज्येष्ठ पुत्र मरण पावेल. जो याच्या वेशी उभारील त्याचा कनिष्ठ पुत्र मरेल.”
27 27 याप्रमाणे परमेश्वराने यहोशवाला साथ दिली आणि यहोशवाची सर्व देशात ख्याती पसरली.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×