Bible Versions
Bible Books

Numbers 8 (ERVMR) Easy to Read - Marathi

1 परमेश्वर मोशेला म्हणाला,
2 “मी तुला दाखविलेल्या जागेवर सात दिवे ठेवण्यास अहरोनास सांग, म्हणजे त्यांचा प्रकाश दीपवृक्षा समोरच्या जागेवर पडेल.”
3 परमेश्वराने मोशेद्वारे दिलेली आज्ञा अहरोनाने मानून त्याने तसे केले; त्याने त्या दिव्यांची तोंडे योग्य दिशेकडे करुन ते योग्य ठिकाणी ठेविले, त्यामुळे दीपवृक्षासमोरील भागावर त्यांचा उजेड पडला.
4 परमेश्वराने मोशेला दाखविल्याप्रमाणे दीपवृक्ष त्यांच्या बैठकीपासून तर त्याच्या सोनेरी पानापर्यंत घडीव सोन्याचा केला होता.
5 परमेश्वर मोशेला म्हणाला,
6 “लेवी लोकांना इतर इस्राएल लोकांपासून वेगळे कर; त्यांना शुद्ध कर.
7 त्यांना शुद्ध करण्यासाठी पापार्पणातील पवित्र पाणी त्यांच्यावर शिंपड म्हणजे त्या पाण्यामुळे ते शुद्ध होतील. मग त्यांनी आपल्या अंगावरील केस काढावेत आणि आपले कपडे धुवावेत; त्यामुळे ते शुद्ध होतील.
8 “लेवी लोकांनी एक गोऱ्हा घ्यावा; त्या सोबत अर्पिण्यासाठी तेलात मळलेल्या पिठाचे अन्नार्पण घ्यावे; मग त्यांनी पापार्पणासाठी आणखी एक गोऱ्हा घ्यावा.
9 तू लेवी लोकांना दर्शनमंडपासमोरील अंगणात आण मग सर्व इस्राएल लोकांना तेथे एकत्र जमव
10 मग लेवी लोकांना परमेश्वरासमोर आण; तेव्हा इस्राएल लोकांनी त्यांच्या डोक्यावर आपले हात ठेवावे.
11 नंतर अहरोनाने त्यांना परमेश्वराला समर्पित करावे. अशा रितीने लेवी लोक पवित्र परमेश्वराची सेवा कराण्यास पात्र होतील.
12 “मग लेवी लोकांना आपले हात गोऱ्ह्यांच्या डोक्यावर ठेवण्यास सांग एक गोऱ्हा परमेश्वरासाठी पापार्पण म्हणून दुसरा होमार्पण म्हणून होईल. ह्या अर्पणामुळे ते लेवी लोक शुद्ध होतील.
13 मग लेवी लोकांना अहरोन त्याचे मुलगे ह्यांच्या समोर उभे राहण्यास सांग. मग त्यांचे ओवाळणीचे अर्पणा प्रमाणे ते परमेश्वराला अर्पण कर.
14 त्यामुळे ते लेवी पवित्र होतील. ते इतर इस्राएल लोकापेक्षा वेगळे असतील, ते माझे लोक होतील.
15 “तेव्हा तू लेवी लोकांना शुद्ध कर आणि ओवाळणीचे अर्पणा प्रमाणे परमेश्वराला त्यांना समर्पित कर. तू हे केल्यानंतर त्यांनी दर्शनमंडपात येऊन आपले काम करावे.
16 इस्राएल लोकांनी लेवी लोक मला द्यावेत. ते माझे होतील. पूर्वी मी प्रत्येक इस्राएलास सांगितले होते की प्रत्येक घरातून प्रथम जन्मलेला मुलगा मला द्यावा. परंतु आता इतर इस्राएलातील प्रथम जन्मलेल्या मुलांच्या ऐवजी मी लेवी लोक घेत आहे.
17 इस्राएलात प्रथम जन्मलेला प्रत्येक नर माझा आहे; मग तो माणसापैकी असो किंवा पशूपैकी असो, तो माझाच आहे; कारण मी मिसर देशातील सर्व प्रथम जन्मलेली मुले पशू मारुन टाकिले आणि म्हणून प्रथम जन्मलेले मुलगे मी माझ्याकरता निवडून घेतले.
18 परंतु आता इस्राएल लोकातील सर्व प्रथम जन्मलेल्या ऐवजी मी लेवी लोक घेतले आहेत.
19 इस्राएल लोकातून मी लेवी लोक निवडले आहेत आणि अहरोन त्याचे मुलगे ह्यांना मी ते दान म्हणून देत आहे. दर्शनमंडपात लेवी लोकांनी सर्व इस्राएल लोकाकरिता काम करावे अशी माझी इच्छा आहे. ते इस्राएल लोकांसाठी असलेली प्रायाश्चिताची अर्पणे करतील त्यामुळे इस्राएल लोक शुद्ध होतील. मग इस्राएल लोक पवित्रस्थानाजवळ आले तरी त्यांना भारी आजार किंवा त्रास होणार नाही.”
20 तेव्हा मोशे, अहरोन आणि सर्व इस्राएल लोकांनी परमेश्वराची आज्ञा मानून परमेश्वराने मोशेला सांगितल्याप्रमाणे त्यांनी लेवी लोकाकरिता सर्वकाही केले.
21 लेवी लोकांनी स्नान केले व, आपले कपडे धुतले. तेव्हा अहरोनाने त्यांना ओवळणी च्या अर्पणाप्रमाणे परमेश्वराला अर्पिले, आणि त्यांच्या पापाबद्दल प्रायश्चित्त करुन त्याने त्यांना शुद्ध केले.
22 त्यानंतलेवी लोक सेवा करण्यास दर्शनमंडपात आले. अहरोन त्याच्या मुलांनी त्यांच्यावर देखरेख केली; कारण ते लेवी लोक करीत असलेल्या सेवेबद्दल जबाबदार होते. परमेश्वराने मोशेकडून अहरोन त्याचे मुलगे ह्यांना सांगितल्याप्रमाणे त्यांनी लेवी लोकांचे सर्व काही केले.
23 मग परमेश्वर मोशेला म्हणाला,
24 ‘लेवी लोकासाठी विशेष आज्ञा अशी आहे की पंचवीस वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या प्रत्येक लेवी माणसाने दर्शनमंडपातील सेवा करण्यात भाग घ्यावा.
25 परंतु लेवी माणूस पन्नास वर्षांचा होईल तेव्हा त्याने आपल्या सेवेतून मोकळे व्हावे; त्याने सेवा करण्याची गरज नाही.
26 त्या वर्षाच्या अथवा त्याहून मोठे असलेल्या लेवी माणसांनी पाहिजे तर दर्शनमंडपात सेवा करणाऱ्या आपल्या बंधूंना त्यांच्या कामात मदत करावी; परंतु त्यांनी स्वत: सेवा करु नये. लेवी लोकांना सेवा करण्यास निवडून घेताना तू हा नियम पाळावा.”
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×