Bible Versions
Bible Books

1 Kings 10 (MRV) Marathi Old BSI Version

1 शबाच्या राणीने शलमोनाची ख्याती ऐकली तेव्हा अवघड प्रश्न विचारुन त्याची कसोटी पाहायला ती आली.
2 2 नोकरा चाकरांचा लवाजमा आणि मसाल्याचे पदार्थ, रत्ने, सोनेनाणे अशा बऱ्याच गोष्टी उंटांवर लादून ती यरुशलेमला आली. शलमोनाला भेटल्यावर तिने सुचतील ते सर्व प्रश्न विचारले.
3 3 शलमोनाने तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली. त्याला कुठलाच प्रश्न अवघड वाटला नाही.
4 4 शलमोन अतिशय हुषार असल्याचे तिच्या लक्षात आले. त्याने बांधलेला सुंदर महालही तिने बघितला.
5 5 त्याच्या मेजावरचे खाणे, त्याच्या सेवकांचा वावर, शलमोनाच्या कारभाऱ्यांची उठबस आणि त्यांच्या पोषाख, त्याने दिलेल्या मेजवान्या आणि मंदिरात केलेले यज्ञ हे सर्व शबाच्या राणीने पाहिले आणि ती आश्रृर्याने थक्क झाली.
6 6 ती राजाला म्हणाली, “तुझ्या चातुर्याबद्दल आणि कारभाराबद्दल मी माझ्या देशात बरेच ऐकले होते. ते वस्तुस्थितीला धरुनच होते.
7 7 पण हे सर्व माझ्या डोळ्यांनी बघेपर्यंत माझा त्यावर विश्वास बसत नव्हता. आता असे वाटते की ऐकले ते कमीच होते. तुझे ऐश्वर्य आणि बुध्दिमत्ता मला लोकांनी सांगितली त्यापेक्षा जास्तच आहे.
8 8 तुझ्या बायकाआणि कारभारी खरेच फार भाग्यवान आहेत. तुझ्या सेवेचे भाग्य त्यांना लाभने आणि तुझ्या ज्ञानाचा लाभ त्यांना होतो.
9 9 परमेश्वर देव थोर आहे. तुझ्यावर प्रसन्न होऊन त्याने तुला इस्राएलचा राजा केले. परमेश्वराचे इस्राएलवर प्रेम आहे. म्हणूनच त्याने तुला राजा केले. तू नियमशास्त्राचे पालन करतोस आणि लोकांना न्यायाने वागवतोस.”
10 10 मग शबाच्या राणीने राजाला जवळजवळ 9,000 पौंड सोने नजर केले. शिवाय मसाल्याचे सुगांधी पदार्थ आणि मौल्यवान हिरेही दिले. इस्राएलमध्ये यापूर्वी कोणी आणले नसतील इतके मसाल्याचे पदार्थ एकट्या शबाच्या राणीने शलमोन राजाला दिले.
11 11 हिरामच्या गलबतामधून ओफिरहून सोने आले. तसेच रक्तचंदनाचे लाकूड आणि भारी रत्नेही आली.
12 12 शलमोनाने या लाकडाचा वापर मंदिरात आणि महालात आधाराचे कठडे उभारायला केला. शिवाय वादकांसाठी वीणा, सतारीही त्यातून करवून घेतल्या. तसे लाकूड परत कोणी कधी इस्राएलमध्ये आणले नाही की त्यानंतर कोणी तसे लाकूड पाहिले नाही.
13 13 दुसऱ्या देशाच्या राज्यकर्त्याला जे रीतीप्रमाणे भेटीदाखल द्यायचे ते सर्व शलमोन राजाने शबाच्या राणीला दिले. शिवाय तिला काय हवे ते विचारुन तेही दिले. यानंतर राणी आपल्या लवाजम्यासाहित मायदेशी निघून गेली.
14 14 शलमोन राजाला दरसाल जवळपास एकोणऐंशी हजार नऊशेवीस पौंड सोने मिळत राहिले.
15 15 या मालवाहू जहाजांखेरीज व्यापारी, सौदागर, अरबस्तानचे राजे तसेच नेमलेले सुभेदार यांच्याकडूनही सोने येत राहिले.
16 16 शलमोन राजाने घडीव सोन्याच्या दोनशे मोठ्या ढाली केल्या. प्रत्येक ढालीचे वजन पंधरा पौंड होते.
17 17 तशाच पण जरा लहान तीनशे घडीव सोन्याच्या ढाली केल्या. त्यात चार पौंड सोने होते. “लबानोनचे वन” नामक वस्तूमध्ये त्याने या ठेवल्या.
18 18 शिवाय शलमोनाने हस्तिदंताचे एक प्रशस्त सिंहासन करवले. ते सोन्याने मढवले होते.
19 19 सिंहासनाला सहा पायऱ्या होत्या. त्याची पाठ कमानदार होती. दोन्ही बाजूला हात होते. हातांच्या खाली दोन्ही बाजूला सिंह होते.
20 20 तसेच सहाही पायऱ्यांवर दोन - दोन सिंह हिते. असे सिंहासन दुसऱ्या कोणात्याही राज्यात नव्हते.
21 21 शलमोनाचे सर्व पेले आणि चषक सोन्याचे होते. “लबानोनचे वन” नामक वास्तूमधली सर्व शस्त्रास्त्रे आणि सामग्री शुद्व सोन्याची होती. चांदीचे काहीही नव्हते. सोने इतक्या मुबलक प्रमाणात होते की शलमोनाच्या कारकिर्दीत लोकांच्या लेखी चांदीला काही किंमत नव्हती.
22 22 राजाकडे अनेक मालवाहू जहाजांचा ताफा होता. त्यांच्या इतर देशांशी व्यापार चाले. ही जहाजे हिरामची होती. दर तीन वर्षांनी ही जहाजे सोने, चांदी, हस्तिदंत आणि जनावरे यांचा नवा साठा घेऊन येत.
23 23 शलमोन हा पृथ्वीतलावरील सर्वात महान राजा होता. त्याच्याकडे सर्वीधिक वैभव आणि बुध्दि चातुर्य होते.
24 24 लोक त्याला पाहायला उत्सुक असत. देवाने त्याला दिलेले बुध्दीचे वैभव त्यांना अनुभवायचे असे.
25 25 ठिकठिकाणाहून दरवर्षी लोक त्याच्या भेटीला येत. येताना प्रत्येकजण नजराणा आणी. सोन्या चांदीच्या वस्तू, कपडे, शस्त्रे, मसाल्याचे पदार्थ, घोडे, खेचरे अशा अनेक गोष्टी ते भेटीदाखल आणत.
26 26 शलमोनाकडे खूप रथ आणि घोडे होते. त्याच्याकडे चौदाशे रथ आणि बाराहजार घोडे यांचा संग्रह होता. रथांसाठी त्याने खास नगरे उभारली आणि त्यात रथ ठेवले. काही रथ त्याच्या जवळ यरुशलेममध्येही होते.
27 27 राजाने इस्राएलला वैभवाच्या शिखरावर नेले. यरुशलेम नगरात चांदी दगडधोंड्यारखी आणि गंधसरुचे लाकूड डोंगरटेकड्यांवर उगवणाऱ्या उंबराच्या झाडासारखे विपुल होते.
28 28 मिसर आणि क्यू येथून शलमोन घोडे आणवत असे. त्याचे व्यापारी क्यूमध्ये ते खरेदी करत आणि तेथून ते इस्राएल मध्ये आणत.
29 29 मिसरचा एक रथ साधारण 15 पौंड चांदीला पडे, आणि घोड्याची किंमत पावणेचार पौंड चांदी इतकी पडे. हित्ती आणि अरामी राजांना शलमोन हे रथ आणि घोडे विकत असे.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×